Lokmat Article – Mothers Day

जीवनातली वाढती स्पर्धा व स्वतःची विविध उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलो होतो. विशेषतः 'वर्किंग मदर'ला कुटुंबाला पुरेसा वेळ देणे कमी झाले होते आणि तो देण्याची आवश्यकता आपल्या सर्वांनाच जाणवत होती. पण, वेळ द्यायचा कसा हाही प्रश्न आपल्यापुढे होता. त्यामुळेच आपल्याला आयुष्यात एका 'पॉज'ची आवश्यकता होती. मात्र, तो करोना या महामारीच्या कारणामुळे नको होता. आता मिळालेला हा वेळ आपला व कुटुंबाचा आहे. याचा पूर्ण उपयोग करून कुटुंबाची वीण आणखी घट्ट करण्याची संधी आपल्याकडे आहे. धकाधकीच्या जीवनामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, असे वर्किंग मदरना वाटते आणि ते खरे आहे.

Mother's Day

इतर वेळेला आपण मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्याची, त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याची खंत मनाला असते. म्हणूनच सध्या लॉकडाउनमुळे आपण घरात असल्यामुळे अनेक गोष्टी बदलू शकणार आहोत विशेषतः कौटुंबिक पातळीवर. आत्ता मिळालेला वेळ हा कुटुंबाचा आहे. त्यामुळे मुलांच्या सवयी बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्यासाठी सध्याच्या कौटुंबिक वेळेचा उपयोग केला पाहिजे. कारण अन्य वेळेला तो देता येत नाही. त्यामुळेच घरात लहान मुले असल्यास त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या पाहिजेत, गोष्टी सांगितल्या पाहिजेत, कोडी सोडवणे, लेखकांची, कवींची माहिती, पुस्तके वाचण्यासाठी दिली पाहिजेत, विरंगुळा म्हणून गाण्याच्या भेंड्या, तसेच आपल्या कुटुंबाची, संस्कृतीची व जगाची ओळख करून द्यायला हवी. तसेच, मुलांना छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम कमी होईल, ज्ञान व कुटुंबवत्सलता आणखी वाढेल. 

गेल्या शंभर वर्षांत जागतिक पातळीवरची एवढ्या तीव्रतेची महामारी आलेली नव्हती. आपल्याकडे प्लेगची साथ आल्याचे केवळ ऐकले होते. करोना महामारी आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची शिकवण देत आहे. त्यामुळे आपली व कुटुंबातील सदस्यांची मानसिक तयारी होईल. नकारात्मक विचारांचा आपण त्याग करायला शिकू. जीवनातल्या अनेक गोष्टी कशा करायला हव्यात याचा दृष्टीकोन आपल्याला यातून मिळणार आहे. उगाचच आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो याची जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे. पुढे जाऊन ती कशी टाळायची याचा विचार आपण करू, असे वाटते. लॉकडाउनमुळे फास्टफूडविना आपण राहू शकतो, हे सगळ्यांनाच कळले आहे. त्यामुळेच आई (वर्किंग मदर) म्हणून कुटुंबाला 'हेल्दी इटिंग हॅबिट' लावण्याची आवश्यकता आहे. प्रथिनयुक्त पौष्टिक आहार वाढवणे आवश्यक असून, यामुळे प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल. 

लॉकडाउन काही भागात शिथिल झाले असले तरी महामारीतून आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायला बराच काळ जाईल. जीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाल्यावर वर्किंग मदरची काळजी घ्यायला हवी. अर्थात, कुटुंब केवळ एका स्त्रीने चालवायचे नसून, सगळ्यांचा हातभार यासाठी आवश्यक आहे, हे आता सगळ्यांना उमजले असेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मदत केल्यास एका व्यक्तीवर येणारा ताण कमी होईल. मुलांनी आपल्या वयानुसार मदत करायला हवी. यामुळे कुटुंबाचे बॉंडिंग वाढेल व एक सुखी कुटुंब तयार होईल, ही महामारीने आपल्याला दिलेली एकप्रकारची संधीच म्हणावी लागेल.

मी माझ्या कामातील अनुभव व कामाच्या ठिकाणी निर्माण करावे लागणारे कौटुंबिक वातावरण या संदर्भात मी मुलांना विचार सांगू शकते. त्यामुळे मुलांना लॉकडाउनमध्ये एक गोष्ट कळली आहे की या घरात असलेली माणसे एवढेच कुटुंब नाही तर आपली जबाबदारी ही त्यापलीकडे आहे. मुलांना जाणीव करून दिली जाते की व्यवसायातील सर्व सहकारी हे आपले कुटुंबीय आहेत. आमच्या व्यवसायात आम्ही सर्व सहकाऱ्यांना कुटुंबाचे एक सभासद मानतो व त्यांच्या बरोबरची आमची वागणूक आमची मुले बारकाईने अनुभवतात. मी स्वतः सासूबाईंनी माझ्या यजमानांवर केलेले आदर्श विचारांचे संस्कार जवळून अनुभवले आहेत. माझ्या आईच्या व सासूबाईंच्या आदर्श विचारांचा वारसा मी पुढे चालविण्याचा प्रयत्न करीत आहे. 

आपल्या सगळ्यांच्या कुटुंबांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी डॉक्टर, सुरक्षा दले, पोलीस, प्रशासन, स्वच्छता कामगार, सुरक्षा रक्षक, शेतकरी आदी करोना महामारीशी लढण्यासाठी दिवस-रात्र कुटुंबाचा त्याग करून काम करत आहेत. अशांचे कर्तृत्व मोठे आहे. या सगळ्यांच्या मागे आपण कुटुंब म्हणूनच उभे राहिले पाहिजे आणि त्यांना लढण्यासाठी घरीच राहून पाठबळ दिले पाहिजे. कारण लढणारे हे सगळेजण एका आईचा मुलगा किंवा मुलगी आहे, हे विसरून चालणार नाही. करोनाशी लढत असलेल्यांना व त्यांच्या आईला सलाम आणि सगळ्यांना मातृत्व दिनानिमित्त शुभेच्छा. 

(लेखिका पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या संचालक आहेत.)

जीवनातली वाढती स्पर्धा व स्वतःची विविध उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलो होतो. विशेषतः ‘वर्किंग मदर‘ला कुटुंबाला पुरेसा वेळ देणे कमी झाले होते आणि तो देण्याची आवश्यकता आपल्या सर्वांनाच जाणवत होती. पण, वेळ द्यायचा कसा हाही प्रश्न आपल्यापुढे होता. त्यामुळेच आपल्याला आयुष्यात एका ‘पॉज’ची आवश्यकता होती. मात्र, तो करोना या महामारीच्या कारणामुळे नको होता. आता मिळालेला हा वेळ आपला व कुटुंबाचा आहे. याचा पूर्ण उपयोग करून कुटुंबाची वीण आणखी घट्ट करण्याची संधी आपल्याकडे आहे. धकाधकीच्या जीवनामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, असे वर्किंग मदरना वाटते आणि ते खरे आहे.

×