Why should invest in Gold

अमित मोडक 

गेल्या आठवड्यात जागतिक पातळीवर सोने प्रति औंसाला १७५० डॉलर पातळीवर जाऊन पुन्हा १७४० डॉलर पातळीवर आले. तसेच, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे विनिमय मूल्य ६० पैशांनी गेल्या तीन दिवसांत घसरले असून, रुपया ७५.२० वरून ७५.८० पातळीवर गेला. या दोन्हींचा परिणाम म्हणून 'एमसीएक्स'वर सोने प्रति १० ग्रॅममागे ४७,३०० ते ४७,४०० रुपयांवर गेले. या पातळीवर सोने हे घेण्यासारखे आहे का नाही, असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास भारतीयांसाठी प्रत्येक भाव पातळीवर सोने, हे घेण्यासारखेच आहे. करोना महामारीमुळे जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी वाईट होण्याची शक्यता आहे. अशा स्थित सोने भावात तेजी येणार आहे.

अनिश्‍चितता कायम 

नुकताच आलेला अमेरिकेतील बेरोजगारीचा दर, युरोप व युरोपियन युनियनमधील देशांचा औद्योगिक उत्पादन वाढीचा दर (आयआयपी), ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ताइवान व जपान येथील आयआयपी; तसेच निर्यात दर निराशाजनक आहे. जगभर लॉकडाउन असल्याने ही आकडेवारी सुधारण्याची शक्यता नाही. तसेच, अशी स्थिती किती दिवस राहणार याबाबत कोणीच निश्चितपणे सांगू शकत नाही.
 
परिस्थिती विपरीत 
करोना महामारीचा प्रादुर्भाव जगभर वाढत असून, याची लोकांना आता भीती वाटू लागली आहे. हा प्रादुर्भाव कमी न झाल्यास औद्योगिक उत्पादन अजून काही महिने बंद राहील. ते पुन्हा सुरू झाल्यावर त्याला मागणी येण्यास काही वेळ जावा लागणार आहे. लोकांच्या मनात अर्थविषयक बाबींबाबत साशंकता निर्माण होऊ लागली आहे. परिणामी लोकांचा आर्थिक जगावरील विश्वास उडायला लागल्यावर सोने हा एकमेव शाश्वत गुंतवणूक पर्याय वाटायला लागतो आणि तो असतोही. सोन्याएवढी गुंतवणूक शाश्वतता कशातच नाही, हे वारंवार सिद्ध होतंय. शेअर बाजार वीस ते पंचवीस टक्के घटले असताना सोने वीस ते पंचवीस टक्के वाढले आहे.
 
पुन्हा कल तेजीचा
शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी रोकड गरज भागवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सोने विक्रीवर काहीसा दबाव आला होता. त्यामुळे सोन्याच्या भावात काही काळासाठी घट झाली होती. पण, शेअर बाजारासाठी लागणारी रोकड उपलब्धता पूर्ण करण्यासाठी उपयुक्त पडले ते सोने होते. रोकड किंवा तरलतेसाठी सोन्यावर विक्रीचा असणारा दबाव संपल्यावर सोन्यात पुन्हा तेजी आली. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांत सोने भाव तेजीत आहे.
 
सोनेच उपयोगी 
एकूण परिस्थिती बघता सोन्याबाबत विचार करायचा झाल्यास सोने खूप शाश्वत गुंतवणूक प्रकार आहे. वर्षभराचा विचार केल्यास जागतिक पातळीवर डॉलरमध्ये सोन्याने तीस टक्के व भारतात रुपयांमध्ये पन्नास टक्के परतावा दिला आहे. भारतात सोने प्रति १० ग्रॅम ३२ हजार रुपयांपासून ४७ हजार रुपयांपर्यंत वाढले आहे. अन्य गुंतवणुक पर्यायांचे परतावे पाहिल्यास सोनेच शाश्वत गुंतवणूक पर्याय वाटते.
 
(लेखक पु ना गाडगीळ आणि सन्स संचालक सीईओ असून, कमोडिटी तज्ज्ञ आहेत.)

गेल्या आठवड्यात जागतिक पातळीवर सोने प्रति औंसाला १७५० डॉलर पातळीवर जाऊन पुन्हा १७४० डॉलर पातळीवर आले. तसेच, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे विनिमय मूल्य ६० पैशांनी गेल्या तीन दिवसांत घसरले असून, रुपया ७५.२० वरून ७५.८० पातळीवर गेला. या दोन्हींचा परिणाम म्हणून ‘एमसीएक्स’वर सोने प्रति १० ग्रॅममागे ४७,३०० ते ४७,४०० रुपयांवर गेले. या पातळीवर सोने हे घेण्यासारखे आहे का नाही, असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास भारतीयांसाठी प्रत्येक भाव पातळीवर सोने, हे घेण्यासारखेच आहे. करोना महामारीमुळे जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी वाईट होण्याची शक्यता आहे. अशा स्थित सोने भावात तेजी येणार आहे.

×