Why gold prices are increasing

PNG: P N Gadgil & Sons
सोने का वाढले?

सोन्यातील गुंतवणूक ही शाश्वत असल्याचे आजवर सोन्याने दिलेल्या परताव्यामुळे सिद्ध झाले आहे. गेल्या 19 वर्षांत सोन्यावर 700 टक्के परतावा दिला असूनसोन्याएवढी रोकड सुलभता कोणत्यात गुंतवणूक प्रकारांत नाही. त्यामुळेच जागरूक होऊन या गुंतवणुकीकडे वळून आपली रोकड सुलभता जास्त शाश्वीक ठेवण्याचा प्रयत्न करणे आपल्याच हातात आहे. ऑगस्ट महिन्यात सराफी बाजारात सोने प्रति 10 ग्रॅमला 40 हजार रुपयांवर पोचले. सोने का वाढते आहे, तसेच, सोन्यातील गुंतवणूक का महत्वाची याचा घेतलेला आढावा.

आदित्य मोडक

आयुष्यात शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. त्यासाठी पै-पै रुपया कोठे, कसा, कधी गुंतवायचा याचा विचार होतो. त्यासाठी स्थावर मालमत्ता, बँकांतील ठेवी, पोस्टातील रिकरिंग, शेअर बाजार आणि सोने-चांदीत गुंतवणूक करतो आणि ती नेहमीच विभागू करायला हवी. कारण यामुळे जोखीम कमी होते. बँकांतील ठेवी, रिकरिंग,पोस्ट रिकरिंग, सेव्हिंग सर्टिफिकेक्टस् आदी गुंतवणुकीचे हे पारंपरिक मात्र सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहेत. स्थावर मालमत्ता हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असली त्यात रोकड सुलभता (त्वरित पैसे) नाही. तसेच, यात गुंतवणूक करण्यासाठी अधिक मूल्य लागते आणि पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम कर्जावर घेऊन मालमत्ता घेतल्यास त्यावर मिळणारा परतावा किती, हे अनेक वेळा तपासले जात नाही. भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हा जोखीम नसणारे गुंतवणूक साधान आहे. मात्र, यात पंधरा वर्षे गुंतवणूक करावी लागते. पाच वर्षांनी ठराविक रक्कम काढण्याच परवानगी असली तरी या गुंतवणूक प्रकारात रोकड सुलभता कमी आहे. तसेच, यातील गुंतवणूक ही भविष्यातील गरजांसाठी वापरली जाते. शेअर बाजार (थेट व अप्रत्यक्ष) हे गुंतवणुकीच जोखीम असणारे पर्याय आहेत. शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या क्षणी गुंतवणूक सकारात्मक परतावा देईलच, असे नाही आणि कारण ही गुंतवणूक बाजारातील चढ-उताराशी संबंधित आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पारंपरिक गुंतवणुकीबरोबर अशावेळी सोने-चांदीतील गुंतवणूक हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. तसेच, ही गुंतवणूक त्वरित रोकड सुलभता देणारी असून, जगभर मान्य आहे.

तब्बल 700 टक्के परतावा

सोने या प्रकाराकडे केवळ दागिना बनविण्याचा धातू एवढ्या मर्यादित दृष्टीने पाहण्याऐवजी त्यात असलेली रोकड सुलभता महत्त्वाची आहे. आपण हौस म्हणून किंवा फॅशन म्हणून एखादी वस्तू खरेदी करतो आणि ज्यात 100-200 रुपयांची कॉच्युम ज्वेलरी असू शकते किंवा 50 हजार वा त्याहून अधिक किमतीची डिझायनर साडी किंवा पैठणी, असू शकते. हौस म्हणून व साज-शृंगाराचे साधन म्हणून आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्या वस्तूंपैकी सोन्याचे दागिने सोडल्यास कशालाच फेरविक्री योग्य किंमत नसते. तसेच,त्याच दागिन्यातील सोने हे वाढत जाणाऱ्या किमतीनुसार पूर्णपणे फेरविक्री योग्य असते. मात्र, अन्य सर्वच साज-शृंगाराच्या वस्तू या शून्य फेरविक्री किंमत असलेल्या असतात. पण, हा फरक जाणून घेतल्यास आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे दागिन्यातील मजुरी मूल्य, हे जर आपण हौस पुरविण्याचा खर्च म्हणून समजल्यास दागिन्यातील सोनेसुद्धा आपण गुंतवणूक ठरवू शकतो. हे विवेचन करण्यामागील कारण म्हणजे बऱ्याच लोकांचा समज हा शुद्ध सोने खरेदी केल्यास गुंतवणूक समजण्याचा आहे. परंतु, दागिना खरेदी केल्यास त्याची पूर्ण किंमत लोक खर्च समजतात. आपण दीर्घकालीन विचार केल्यास 2001 मध्ये सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव 4000 रुपयांवर होता आणि त्यावर 10 टक्के मजुरी देऊन 4400 रुपये किमतीला खरेदी केलेल्या दागिन्याची आज मजुरी वाया गेली, असे समजल्यासही फेरविक्रीतून 35 हजार रुपये (आजच्या दराने) आपणास मिळवून देऊ शकते. म्हणजेच 19 वर्षांत साज शृंगारासाठी हौस भागवून चार हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 31 हजार रुपये जास्तीचे म्हणजेच मुद्दलावर सुमारे 700 टक्के एवढा परतावा सामान्यांना मिळाला आहे. सोन्याचे दागिने करणे, हे भारतीय परंपरेत चोख सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा जास्त आकर्षक ठरले आहे. कारण, दागिना केला असता तो दीर्घकाळ बाळगला जाऊन त्यातील सोन्याची अल्पावधीत विक्री न होऊन चांगला परतावा मिळू शकतो, ही भारतीय समाजाची मनाशी बांधली गेलेली दीर्घकालीन खूणगाठ आहे.

जागतिक घडामोडींचे पडसाद

गेल्या 19 वर्षांचा विचार केल्यास सोने-चांदीतील गुंतवणूक ही गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांच्या तुलनेत आकर्षक परतावा देण्यात यशस्वीच ठरले आहे. 2015 मध्ये सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव 26,500 रुपयांवर होता आणि 2019 मध्ये तो प्रति दहा ग्रॅम 36 हजार रुपयांच्या पुढे आहे. सोन्याची ही झळाळी कायम असून, वार्षिक सरासरी 11 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देणारी ठरली. जोखीम असणाऱ्या गुंतवणूकप्रकारांत मोठी अस्थिरता असून, ती नकारात्मक दिशेनेच अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, चीन-अमेरिकेतील फिसकटलेली व्यापार बोलणी, उत्तर कोरियाकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्या, भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेला तणाव आदींमुळे सोन्याची मागणी वाढत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रकारचे फंड व मध्यवर्ती बँकांकडून मागणी वाढली. त्यामुळे जागतिक पातळीवर सोने भाव वाढतच आहेत. डॉलरच्या तुलनेत गेल्या काही दिवसांपासून रुपया सातत्याने घसरत आहे. त्यामुळेही सोन्याचे भाव वाढत आहेत.

चलन विनिमय दरामुळे फरक

सोने भावातील वाटचालीत पूर्वी आर्थिक क्षेत्रातील घडामोडींना अवास्तव महत्व नव्हते किंवा आर्थिक क्षेत्रात खळबळ माजविण्याएवढी बेशिस्त अस्तित्वात नसताना म्हणजे साधारण 2008 च्या आर्थिक संकटापूर्वीपर्यंत सोन्याचे भाव हे भौगोलिक अस्थिरता, नैसर्गिक आपत्ती आणि कच्च्या तेलाचे वा इंधनाचे भाव यांच्याशीच जास्त करून जोडले जायचे. 2006 पर्यंत सोन्याचे प्रति औंसमधील डॉलरमधील भाव हे कच्च्या तेलाच्या प्रति पिंपाच्या डॉलरमधील भावाच्या आठ पट होते आणि ते दहा पटीपर्यंत गेल्यास सोने कमकुवत होण्याची शक्यता लोक वर्तवायचे. तसेच, ते सात पटीच्या खाली आल्यास लोक सोन्यात तेजी येण्याची शक्यता वर्तवत होते. आर्थिक क्षेत्रातील घडामोडींनी महत्त्व वाढू लागल्यावर सोन्याचा भाव हा जास्त करून डॉलेक्स इंडेक्सशी जोडला गेला. डॉलेक्स इंडेक्स जेवढा कमी तेवढा सोन्याचा भाव जास्त, तर डॉलेक्स इंडेक्स जेवढा जास्त तेवढा सोन्याचा भाव कमी, असे सूत्र झाले. सध्याच्या स्थितीत डॉलेक्स इंडेक्स हा मजबूत आहे आणि तरीही सोन्याचे भाव वाढत आहेत, याचे कारण डॉलेक्स इंडेक्सची मजबूती ही डॉलरच्या नैसर्गिक मजबुतीमुळे नसून, अमेरिकेव्यतिरिक्त सर्वच देश आपापली निर्यात आकर्षक होण्यासाठी आपापल्या देशाचे चलन कमकूवत ठेवत आहेत. भारताचे चलन हेसुद्धा आपल्याला कमकुवत दिसत असल्याने सामान्य माणसाला आपला देश गरीब असल्यासारखे वाटत आहे. मात्र, चलन कमकूवत ठेवण्यामागे सरकारचे दोन हेतू आहेत. पहिला म्हणजे निर्यात आकर्षक राहावी व दुसरा अनावश्यक तसेच, चैनीच्या वस्तू गरज नसताना परदेशातून येत असल्याने त्या महाग पडाव्यात. पूर्वीच्या काळी एवढ्या सखोल पद्धतीने चलनाचे व जागतिक व्यापाराचे हितसंबंध माहीत नव्हते. त्यामुळे ज्या देशाचे चलन ताकदवान तो देश श्रीमंत, असे गणित मांडले जायचे. मात्र, जगभरात निर्याताभिमुख अर्थव्यवस्था निर्माण होऊ लागल्यावर या विचारात पूर्णपणे फरक पडला.

सोन्याचा सध्यातरी कल चढाच

आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात स्थैर्य आल्याशिवाय भाव खाली येण्याची शक्यता दिसत नाही. एमसीएक्सवर 26 ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव 39,340 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर, तर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंसाल 1550 डॉलरच्या पातळीवर गेला होता. आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक क्षेत्रात स्थैर्य आल्याशिवाय भाव खाली येण्याची नाही. (सोन्याचे भाव भारतात जागतिक पातळीवरील डॉलरमधील भाव, रुपया-डॉलर विनिमय मूल्य व भारत सरकारचे आयात कर दर यावर अवलंबून असतात.) जागतिक पातळीवर आर्थिक स्थिती व भूराजकीय संबंध लक्षात घेता सोन्याला मागणी राहणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोने व चांदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओत सोने-चांदी असलेच पाहिजे. जागतिक पातळीवर परिस्थिती न सुधारल्यास व भारत-पाकिस्तान संबंध आणखी चिघळल्यास अल्पावधीत सोने 42 हजार रुपयांची पातळीही गाठू शकते. आपण जागरूक होऊन या गुंतवणुकीकडे वळले पाहिजे ज्यामुळे आपली रोकड सुलभता जास्त शाश्वीक राहील.

सोने मागणीला चीनी तडका

मेपासूनच चीन सरकारने खुल्या बाजारातील आयातीवर निर्बंध आणले होते. मात्र, आता हे निर्बंध अंशतः हटवले असून, यामुळे चीनच्या खुल्या बाजारात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आले. परिणामी सुमारे 15 ते 25 अब्ज डॉलर किंमतीचे 300 ते 500 टन सोने आता चीनच्या खुल्या बाजारातही आयात होऊ शकते. भारताच्या वर्षभरातील एकूण मागणीच्या निम्मे सोने असा हिशेब आहे. चीनमध्ये हा प्रलंबित असलेला पुरवठा वाढल्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर पुढच्या काही दिवसांत दिसेल असा अंदाज आहे. त्यामुळे किंमत वाढण्याची शक्यता आहे.

हे सोने खरेदी करण्यासाठी तेथील बँकांमध्ये डॉलरचा खप वाढेल. त्याचा परिणाम म्हणून युवान हे चीन चे चलन कमकुवत किंवा डॉलरच्या तुलनेत महाग होणार आहे. चीनला त्यांचे युवान हे चलन डॉलरच्या तुलनेत कमकुवत करण्याची इच्छा आहेच. कारण, अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. चीनचे चलन कमकुवत झाले तर निर्यात स्वस्त होईल आणि अमेरिकेने कर वाढवले तरीही चीनच्या वस्तू स्वस्तच राहतील, अशी त्यामागची योजना असू शकते. आपल्या चलनाची किंमत नेहमी कमी ठेवणे हा व्यापार युद्धाचा एक भाग आहे.

युवानची किंमत कमी ठेवून निर्यातीचा प्रयत्न चीनकडून होत असतो, यावरही अमेरिकेचा आक्षेप आहेच. त्यामुळे आता सोन्याची मागणी चीनमध्ये वाढल्यानंतर सोन्याची खरेदी करण्यासाठी आपोआपच डॉलरचा खप वाढेल. त्या तुलनेत युवान कमकुवत होत जाईल. जागतिक बाजारपेठेमध्ये देखील सोन्याची मागणी वाढलेली दिसेल. त्याचा परिणाम म्हणून मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढल्यामुळे जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यूता आहे. दरम्यान, चीनने अमेरिकी वस्तूंवरील आयात कर वाढविल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्फ यांनी शुक्रवारी सायंकाळी सर्व आर्थिक बाजार बंद झाल्यावर आर्थिक जगास धमकविण्याचे ट्विट सुरू केले आहे. चीनी वस्तूंवर जास्तीचा 5 टक्के आयात कर वाढीची घोषणा केली आहे. त्याने आधीच घबराहट निर्माण झालेल्या आर्थिक जगात अस्थिरता पसरवली आहे.

सोन्यातील गुंतवणूक ही शाश्वत असल्याचे आजवर सोन्याने दिलेल्या परताव्यामुळे सिद्ध झाले आहे. गेल्या 19 वर्षांत सोन्यावर 700 टक्के परतावा दिला असूनसोन्याएवढी रोकड सुलभता कोणत्यात गुंतवणूक प्रकारांत नाही. त्यामुळेच जागरूक होऊन या गुंतवणुकीकडे वळून आपली रोकड सुलभता जास्त शाश्वीक ठेवण्याचा प्रयत्न करणे आपल्याच हातात आहे. ऑगस्ट महिन्यात सराफी बाजारात सोने प्रति 10 ग्रॅमला 40 हजार रुपयांवर पोचले. सोने का वाढते आहे, तसेच, सोन्यातील गुंतवणूक का महत्वाची याचा घेतलेला आढावा.

×