Lamp Exhibition P N Gadgil and Sons

P. N. Gadgil & Sons - Lamp Exhibition


पारंपरिक दिव्यांचे पुण्यात प्रदर्शन

दीपावलीनिमित्त ‘झपूर्झा’ – ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे आयोजन

पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. इनिशिएटिव्ह व झपूर्झा - क्रिएटीव्हिटी हब यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त ‘दिव्या दिव्या दीपत्कार’, हे दिव्यांचे प्रदर्शन पुण्यात बालगंधर्व रंगमंदीर कलादालनात भरविले आहे. याचे उद्घाटन 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते झाले.

दिव्यांचे प्रदर्शन 19 ते 25 ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असून, सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत खुले राहणार आहे. भारतीय संस्कृतीत दिव्यांना विशेष स्थान आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपण विविध सणांना दिवे लावतो व दिव्यांचा उत्सवही साजरा करतो. भावी पिढीला दिव्यांची नवी ओळख व्हावी या हेतूने हे प्रदर्शन भरविले आहे, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे अध्यक्ष व झपूर्झाचे संस्थापक श्री. अजित गाडगीळ यांनी सांगितले.

‘आपल्या संस्कृतीत जन्मापासून मराणापर्यंत दिव्यांचा संबंध अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट होतो. अंधार दूर करण्यासाठी तंत्रज्ञानामुळे दिव्यांना विशेष महत्व उपलब्ध झाले व उत्तरोत्तर आपल्या दैनंदीन जीवनात त्याचा जास्त प्रभाव दिसू लागला. पण, असे होत असताना दिव्याशी निगडित मूल्य व सांस्कृतीक ठेवा कोठेतरी लोप पावतो आहे. दिव्यांचे आपल्याकडे असणारे महत्व व त्यांचा आदिम काळापासूनचा प्रवास या ठिकाणी माहितीच्या रूपानेही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, तंत्रज्ञानामुळे विविध प्रकारच्या क्षेत्रांत दिव्यांच्या नाविन्यपूर्ण वापरामुळे जीवन सुलभ झाले आहे. त्याची काही प्रतीक येथे पहायला मिळतील,’ असे गाडगीळ यांनी नमूद केले.

प्रदर्शनात दोनशे वर्ष जुने दिवे मांडले असून, यात रेल्वे-सिग्नल, जहाज, सायकल, वाहने व घरगुती वापराचे दिवे, पारंपरिक व कलात्मक दिवे पाहता येतील. प्रदर्शनाचे मुख्य क्युरेटर दिलीप जोशी व क्युरेटर विक्रम मराठे आहेत.