Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4739 |
Gold 18 ct | Rs. 6075 |
Gold 22 ct | Rs. 7452 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 8050 |
Gold 24 ct (995) | Rs. 8070 |
Gold 24 ct (999) | Rs. 8100 |
Silver | Rs. 92.50 |
Silver Bar | Rs. 93.00 |
सार्वभौम, मनःशांती, शाश्वत सोनेच
अमित मोडक
जागतिक पातळीवर आर्थिक, राजकीय व अन्य कारणामुळे अस्थिरता निर्माण झाल्यावर त्याचे पडसाद जगभर उमटायला सुरू होतात. परिणामी गुंतवणूदार, विविध देशांच्या मध्यवर्ती बँका अशा गोष्टींपासून आर्थिक बाबतीत भक्कम राहण्यासाठी सोने गुंतवणुकीकडे वळतात. गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये जागतिक पातळीवर कोव्हिड १९ मुळे बहुतेक सर्वच देशांनी लॉकडाउन जाहीर केले होते आणि तीन महिने जागतिक अर्थव्यवस्थेचे चक्र बंद पडले होते. पण, कोव्हिड १९ महामारीने जगाला ग्रासण्यापूर्वीच भूराजकीय अस्थिरता व जागतिक पातळीवर मागणी रोडावत असल्याने सुरक्षित व शाश्वत गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्यामध्ये विविध देशांच्या मध्यवर्ती बँका, गोल्ड ईटीएफ फंड, मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यास सुरवात केली होती. त्यामुळे सोन्याची भाववाढ सुरू झाली होती. जून २०२० नंतर जागतिक पातळीवर व भारतात ही अनलॉक प्रक्रिया आर्थिक पातळीवर सुरू झाली होती. पण, लॉकडाउनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला फटका भरून निघण्यास वेळ लागणार होता. परिणामी गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे सुरूच होते. त्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये भारतात सोने प्रति दहा ग्रॅम ५६ हजार रुपयांच्या उच्चांकी पातळीवर, तर जागतिक पातळीवर डॉलर मूल्यात प्रति औंस २०७० डॉलरवर गेले होते.
अस्थिरतेत पुन्हा खरेदी
नोव्हेबर २०२० नंतर कोव्हिड संसर्ग कमी झाल्याने व लसीच्या उपलब्धतेची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी व गोल्ड ईटीएफ फंडांनी सोन्यात उच्चांकी पातळीवर हळूहळू प्रॉफिट बुकिंग करण्यास सुरवात केली. तसेच, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदी मंदावली. त्यामुळे सोन्याचा उच्चांकी पातळीवर पोचलेला भाव मार्च २०२१ मध्ये ४५ हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. पण, जागतिक पातळीवर फेब्रुवारीमध्ये कोव्हिड १९ ची दुसरी लाट सुरू झाल्याने अनेक देशांमध्ये विशेषतः युरोपमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले होते. तसेच, भारतातही फेब्रुवारीपासून कोव्हिड १९ चा संसर्ग वाढण्यास सुरवात झाली होती आणि एप्रिलमध्ये परिस्थिती खूपच बिघडली. त्यामुळेच एकूणच जागतिक पातळीवरील व देशांतर्गत स्थितीमुळे गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित व शाश्वत असलेल्या सोने गुंतवणूक पर्यायाकडे वळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळेच ४५ हजार रुपयांपर्यंत खाली आलेले सोने पुन्हा ४८ हजार रुपयांजवळ आले. तसेच, प्रति किलो ६२ हजार रुपयांवर आलेली चांदी पुन्हा ७२ हजार रुपयांवर आली आहे.
भाववाढीस परिस्थिती अनुकूल
सोने-चांदीच्या भावात पुन्हा अल्पकालावधीत झालेली भाववाढ आगामी काळात तेजीचे संकेत देत आहे. त्यामागे कारणेही आहेत. जागतिक अर्थव्यस्थेला बसलेला फटका हा लगेच भरून निघणारा नाही. जागतिक पातळीवर चलनापेक्षा सोन्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक आहे. त्यामुळे शाश्वत गुंतवणुकीसाठी सोने गुंतवणुकीस आगमी काळात प्राधान्य दिले जाण्याची शक्यता असल्याने व सध्याच्या सोने-चांदीतील तेजीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या नव्या उच्चांकी पातळीचे अंदाज वर्तविले जात आहेत आणि त्यात तथ्यही आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह १२० अब्ज डॉलरचे बाँड दर महिन्याला खरेदी करणार असून, डिसेंबर २०२१ पर्यंत ही खरेदी कायम ठेवणार आहे. तसेच, मागणीवर परिणाम होऊ नये म्हणून बाजारात लिक्विडिटी राहण्यासाठी अमेरिकेत व्याजदरातदेखील डिसेंबर २०२२ पर्यंत बदल होण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे बाँड यिल्डदेखील वाढण्याची शक्यता कमी आहे. या सर्व गोष्टी सोन्याला पोषक आहेत. सध्या आर्थिक अस्थिरता असून, कोव्हिड १९ तिसरी लाट येण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. कोव्हिड १९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचे अर्थव्यवस्थेवरील प्रत्यक्षातील परिणाम संपूर्णतः दिसण्यास अजून काही कालावधी जावा लागणार असून, अशामुळे आगामी काळात अस्थिरात वाढू शकते. परिणामी रोजगार कमी होऊ शकतो, औद्योगिक उत्पादन मंदावू शकते, चलने कमकूवत होऊ शकतात व या सर्वांमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच, या सर्व बाबी अप्रत्यक्षपणे सोन्यावर प्रभाव पाडतील व सोने महाग होऊ शकते. सोन्याप्रमाणे चांदीही मौल्यवान धातू आहे. त्यामुळे यावरही परिणाम होईल.
मध्यवर्ती बँकांचा कल महत्त्वाचा
सोने-चांदी एकमेकांबरोबर चालतात असे म्हणतात. पण, मध्यंतरी या धातूंचे गुणोत्तर ११०-१२० पर्यंत गेले होते आणि आता परत ते ८०-८५ पर्यंत आले आहे. पारंपरिक पद्धतीने विचार केल्यास पूर्वी सोने-चांदीचे गुणोत्तर ५०-६० आदर्श मानले जायचे. असे गुणोत्तर यायचे झाल्यास चांदी तरी महाग व्हायला पाहिजे किंवा सोने तरी स्वस्त व्हायला पाहिजे किंवा सोने महाग होऊन त्याबरोबर चांदीही वाढायला पाहिजे. सोने स्वस्त होऊन चांदी आहे तिथेच राहील, असे वाटत नाही. सोन्याला भारतात मागणी वाढत आहे आणि ती ईटीएफ, ज्वेलरीतून येत आहे. तसेच, जानेवारी २० ते एप्रिल २० दरम्यान मध्यवर्ती बँकांनी १६६०-१६८० डॉलरला सोने खरेदी केली होती. पण, जुलै २०२० नंतर थांबविली आणि आता परत या बँकांची सोने खरेदीची मानसिकता प्रति औंस १६०० ते १७०० डॉलर पातळीवर दिसत आहे. यामागे अर्थव्यवस्थेची अस्थिरता, कोव्हिड १९ ची आलेली पहिली-दुसरी लाट लक्षात घेऊन वा तिसरी लाट येण्याची शक्यता धरून आणि अन्य आर्थिक कारणांमुळे पुन्हा सोने खरेदी करणार असल्यास सोन्याचा भाव वाढू शकतो.
वर्षभरता १९ टक्के रिटर्न
सोने गुंतवणूक म्हणून विचार करणार असल्यास सोने दीर्घकालीन परतावा चांगला देते हे आतापर्यंत वारंवार स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा-सोळा वर्षांत सोन्याने वार्षिक पंधरा टक्के परतावा दिला आहे. तसेच, करोनामुळे लॉकडाउन होण्यापूर्वी म्हणजे मार्च २०२० पासून आतापर्यंत म्हणजे दुसऱ्या लाटेपर्यंत सोन्याने १७ टक्के रिटर्न दिले आहेत. तसेच, आगामी काळातही सोन्यात दीर्घकाळात परतावा देण्याची क्षमता आहे.
रुपया-डॉलर मूल्य महत्त्वाचे
रुपयाला स्थैर्य देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही पावले उचचली आहेत. मात्र, ही बाब अमेरिकी सरकारच्या लक्षात आली आहे. त्यामुळे त्यांनी भारताचा समावेश करन्सी मॅन्यूपलेशन करणाऱ्या देशांच्या यादीत केला आहे. एफआयआयचा फ्लो अर्थात ओघ भारताला हवा असल्यास रुपयाचे व्यवस्थापन थांबवावे लागेल. कारण यामुळे मध्यंतरी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सुधारून ७२.५० च्या पातळीवर गेले होते. मात्र, नंतर तो पुन्हा ७५.५० च्या पातळीपर्यंत कमकूवत झाला. रुपयात कमकूवतता अशीच कायम राहिल्यास त्याचे परिणाम सोने भावावर होईल. उदा. जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस एक डॉलर वाढीने बदलतो तेव्हा भारतात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २६ रुपयांनी बदलतो. तसेच, रुपयाचे आहे. रुपया एका पैशाने प्रति डॉलर कमकूवत झाल्यास सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सहा रुपयांनी वाढतो आणि या उलट रुपया १ पैशानी ताकदवान झाल्यास सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ६ रुपयांनी कमी होतो. सध्या ७४ आसपास असलेला रुपयाचे आरबीआयने चलन व्यवस्थापन बंद केल्यास ७६ रुपये प्रति डॉलपर्यंत कमकूवत होऊ शकतो. अशा परिस्थिती सोन्याचा जागतिक बाजारपेठेतील भाव बदलला नाही तरीदेखील २०० पैशांच्या मागे १२०० रुपये प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव केवळ रुपया कमकूवत झाल्याने वाढू शकतो. त्याचवेळेस जागतिक पातळीवर प्रति औंस १०० डॉलरनी सोने वाढल्यास प्रति १० ग्रॅम २६०० रुपयांनी सोने वाढू शकेल. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस १०० डॉलरनी वाढल्याने व रुपया २ रुपया प्रति डॉलरने कमकूवत झाल्यास भारतात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३८०० ते ४००० रुपयांनी वाढू शकतो. (सधाच्या प्रति १० ग्रॅम ४८ हजार रुपये असलेला भाव प्रति १० ग्रॅम ५२ हजार रुपयांवर जाऊ शकतो.)
मोठ्या तेजीचे संकेत
चलन मूल्य व त्याबरोबर महागाई, जीडीपीतील घसरण, आयाआयपी मंदावणे यांचा विचार केल्यास, आगामी काळात सोने प्रति दहा ग्रॅम ६० हजार रुपये, तर पुन्हा प्रति औंस २०७० डॉलर किंवा त्याहून अधिक जाईल, असे सोने भावपातळीचे नवे अंदाज जगभर वर्तविले जाणे स्वाभाविक आहे. पण, सोने-चांदीत एकदम गतीने तेजी दिसण्याची शक्यता कमी वाटते. डिसेंबर २०२२ पर्यंत सोने कधीतरी एकदा प्रति १० ग्रॅम ६० हजार रुपये भाव दाखवू शकते. कॅलेंडर वर्षातील चार महिने संपले असून, पुढील २० महिन्यांचा विचार केल्यास सधा ४७-४८ हजार रुपयांवर असणारे सोने ५६ हजार रुपयांवर डिसेंबर २०२१ पर्यंत जायला हरकत नाही. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या २४ महिन्यांत सोने १८ ते २० टक्के म्हणजे वार्षिक ९-१० टक्के परतावा मिळायला अडचण दिसत नाही. चांदी भावाबाबतही विविध अंदाज वर्तविले जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ५० डॉलर जाण्याचा अंदाज आहे आणि असे झाल्यास आत्ताच्या रुपया डॉलरच्या गुणोत्तरामध्ये चांदीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील २६ डॉलरच्या तुलनेत ६६ हजार रुपये आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तो ५० डॉलर झाल्यास भारतात १ लाख २० हजार रुपयांपर्यंत चांदीचा भाव जाऊ शकतो.
मानसिक स्वास्थ्य वाढविणारा पर्याय
सोने-चांदीच आगामी काळात तेजी आली तरी त्यात प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता वाटत नाही. कारण या दोन्ही धातूंची भाववाढ मनाला समाधान, शांती व सुख देणारी आहे. यातून मिळणारे सूख हे मानसिक स्थिरता वाढविण्यास मदत करते आणि मानसिक स्थिरता असणे हे आरोग्यासाठी चांगले आहे, असे सांगितले जाते. तसेच, आपण सध्या वाढलेल्या भावात सोने-चांदी घेत आहोत याचे गुंतवणूकदारांनी दुःख मानण्याऐवजी आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे वाढलेल्या मूल्याचा आनंदोत्सव साजरा करणे गरजेचे आहे.
सोन्याचे आर्थिक गुणधर्म
चलनाला सार्वभौमत्व मिळण्यासाठी विविध देशाच्या मध्यवर्ती बँका सोनेच ठेवतात.
जगाच्या बाजारपेठेत सार्वभौमत्व असणारा एकमेव धातू आणि म्हणूनच मौल्यवान.
चलनापेक्षाही गुंतवणूकदारांचा सोन्यावर अधिक विश्वास, अस्थिरतेत सोन्यातच गुंतवणूक.
महागाई वाढल्यास सोनेही वाढते. म्हणजे महागाईशी सामना करण्यासाठी उपयुक्त.
अन्य कोणत्याही मालमत्तेपेक्षा सर्वाधिक रोकड सुलभ.
आजपर्यंतच्या सोने भावाच्या ज्ञात इतिहासात दीर्घकाळात सोन्यात चांगलेच रिटर्न.
शाश्वत म्हणून समजला जाणारा जागतिक पातळीवरील एकमेक गुंतवणूक पर्याय.
(लेखक कमॉडिटी तज्ज्ञ असून, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे संचालक-सीईओ आहेत.)
जागतिक पातळीवर आर्थिक, राजकीय व अन्य कारणामुळे अस्थिरता निर्माण झाल्यावर त्याचे पडसाद जगभर उमटायला सुरू होतात. परिणामी गुंतवणूदार, विविध देशांच्या मध्यवर्ती बँका अशा गोष्टींपासून आर्थिक बाबतीत भक्कम राहण्यासाठी सोने गुंतवणुकीकडे वळतात.
WhatsApp us