Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4311 |
Gold 18 ct | Rs. 5528 |
Gold 22 ct | Rs. 6780 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7320 |
Gold 24 ct (995) | Rs. 7340 |
Gold 24 ct (999) | Rs. 7370 |
Silver | Rs. 89.00 |
Silver Bar | Rs. 89.50 |
ही 'सुववर्ण'संधी साधायची?
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रति १० ग्रॅम ५६ हजार रुपयांवर पोचलेले सोने ४४ हजार रुपयांजवळ आले आहे. सोन्यात झालेली घसरण ही खरेदीची संधी आहे का, याचा घेतलेला आढावा.
अमित मोडक
ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात सोन्याने प्रति १० ग्रॅम ५६ हजार रुपयांचा उच्चांकी भाव गाढला होता. मार्च २०२० पासून कोव्हिड १९ या महामारीने जगभर उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली होती. परिणामी उद्योग-धंदे बंद पडू लागले होते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी घटत होत्या. त्यामुळे जागतिक पातळीवर सोने भावात मार्च २०२० पासून वाढ होण्यास सुरुवात झाली. मार्च २०२० च्या मध्यात प्रति औंस १५२० डॉलरवर असणार असणारे सोने २०७० डॉलरपर्यंत पोचले होते. भारताच्या रुपयाचे विनिमय मूल्य डॉलरच्या तुलनेत ७५ च्या पातळीवर पोचले होते. या सर्व कारणांमुळे सोन्याचा भाव भारतात प्रति १० ग्रॅम ५६ हजार रुपयांवर गेला होता.
सध्याचा विचार करायचा झाल्यास सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४४ ते ४५ हजार रुपयांच्या आसपास आहे. सोन्याचा भाव एवढ्या पातळीवर कशामुळे आला?, सोन्याचे मूल्य कमी झाले की सोन्यातील गुंतवणुकीचे रस कमी झाला?, असे प्रश्न प्रत्येकालाच पडले असतील. सोन्यात गुंतवणूक कशामुळे होते, हे पहिले लक्षात घेतले पाहिजे. जोखीम कमी करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक होते वा त्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. कोव्हिड महामारीमुळे जोखीम वाढली असल्याने गुंतवणूकदार वा लोकांचा कल सोन्यातील गुंतवणुकीकडे होता. पण, जोखमी कमी होण्यास सुरुवात झाल्यावर लोकांचा सोन्यातील रसही कमी होऊ लागला. त्यामुळे जागतिक पातळीवर ऑगस्ट २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात प्रति औंस २०७० डॉलरवर पोचलेले सोने नुकतेच प्रति औंस १६८० डॉलरच्या खालच्या पातळीवर आणि भारतात एमसीएक्सवरील भावाच विचार करायचा झाल्यास सोने प्रति दहा ग्रॅम ४३,९०० रुपयांच्या पातळीवर आले होते. सोन्याचा हजर बाजारातील भाव विचारात घेतल्यास तो प्रति १० ग्रॅम ४४,२०० ते ४४,३०० रुपयांजवळ आहे.
परिस्थिती सुधारू लागली
भाव एवढ्या खाली येण्याची कारणे विचारात घेतल्यास कोव्हिड २०१९ मुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून निघण्यास खूप कालावधी लागेल, असेच कयास बांधले जात होते. प्रत्यक्षात सप्टेंबर २०२० पासून औद्योगिक स्थिती, रोजगार संधी यात झपाट्याने सुधारणा दिसू लागली. औद्योगिक क्षेत्रात आलेली मरगळ दूर होत असल्याचे संकेत मिळू लागले. तसेच, सुधारणा होण्याबरोबर अस्थिरता कमी होण्यास सुरवात झाली, भीतीचे वातावरण कमी होऊ लागले, लोकांची क्रयशक्ती निर्माण होण्यास सुरवात झाली, बँकिंग प्रणाली व्यवस्थित सुरू झाली. या सर्व कारणांमुळे लोकांचा सोन्यातील रस कमी होऊ लागला. कारण भीती असते तेव्हा सोने असते आणि आनंद असते तेव्हा ते लक्झरी वा फॅशन असते.
अमेरिकेत बाँड परतावा वाढला
लोकांची भीती कमी होण्यास सुरुवात झाल्यावस हजर सोन्याची मागणी कमी झाली. (भीती व्यक्तिगत नसते तर संस्थात्मक (वित्तीय संस्था) पातळीवरही भीती असते. आकडेवारी पाहिल्यास जुलै २०२० पासून एकाही मध्यवर्ती बँकेने सोने खरेदी केलेले नाही. जुलै २०२० ला कोव्हिड १९ नियंत्रण येत असल्याचे संकेत मिळू लागले. मध्यवर्ती बँकांकडून मागणी न आल्याने बाजारातून मोठ्याप्रमाणत हजर सोने बाहेर गेलेच नाही. मात्र, पुरवठा तेवढाच राहिला. अमेरिकेतील एसपीडीआर या सर्वांत मोठ्या गोल्ड ईटीएफ फंड हाउसने सोन्याची विक्री केली. गोल्ड ईटीएफमधील पैसे लोक काढून घेऊ लागल्याने सोने विक्रीस आले. त्याचबरोबर अमेरिकेच्या बाँड मार्केटचा परिणाम सोने भावावर झाला. अमेरिकेत स्टिम्युलस दिल्यास बाँड मार्केट गडगडेल, रिटर्न शून्य टक्क्याजवळ येतील असे अनेकांना वाटत होते. पण, घडले मात्र विरूद्ध. लोकांनी सोने खरेदी न करता डॉलरमधील १० वर्षे मुदतीचे बाँड खरेदी करण्याचा सपाटा लावला. परिणामी त्या ठिकाणी बाँडवरील व्याज वाढत गेले. मागणी वाढल्याने बाँड उपलब्ध नव्हते आणि प्रत्येकालाच खरेदी करायचे होते. त्यामुळे उच्च दराने ते खरेदी होऊ लागले. त्यामुळे बाँडचे यिल्ड अर्थात व्याज दोन टक्क्याजवळ गेले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर शून्य टक्का केला असला तरी फेडचे १० वर्षे मुदतीचे बाँड मात्र २ टक्क्याजवळ पोचले आणि त्यांची आजही बाजारात सहज खरेदी-विक्री होत आहे.
सध्या मोठी तेजी नाही
बाँडचे यिल्ड अर्थात व्याज कमी होणार नाही, ते १ टक्क्याच्या खाली येत नाही, चलन मूल्य मजबूत होत नाही व बाँड कमकूवत होत नाही तोपर्यंत सोने भावात तेजी येण्याची शक्यता कमी आहे. लोकांचा कल बाँड, शेअर बाजाराच्या गुंतवणुकीकडे राहिल्यास सोन्यात गुंतवणूक येण्याचे प्रमाण कमी राहणार. परिणामी सोन्याचा भाव पुन्हा वाढण्याची शक्यता कमी आहे. भारतीय पार्श्वभूमी विचारता घेतल्यास भारतात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक येत राहिल्याने डॉलरचा ओघ चांगला राहिला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सुधारले. भारतात सोन्यावर परिणाम करणारे दोन घटक असतात. जागतिक पातळीवरील भाव व रुपया-डॉलरचे विनिमय मूल्य. जागतिक पातळीवर २०७० डॉलरवर असणारा सोन्याचा भाव घटून १७०० डॉलर पातळीवर आला. म्हणजे सोन्याचा भाव सुमारे १५ टक्के घसरले, तर डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होऊन ७५.५० पातळीवरून ७२.२० या नजीकच्या नीचांकी पातळीवर आला. सध्या रुपया ७२.८० पातळीवर आहे. रुपया कमकूवत होत नाही वा डॉलर मजूबत होत नाही व जागतिक पातळीवर सोन्याचा डॉलर मूल्यात भाव सुधारत नाही तोपर्यंत भारतात सोन्यात मोठी तेजी येण्याची शक्यता कमी आहे.
सोने ट्रेड होते, म्हणून...
सोन्यात गुंतवणूक ही दीर्घकालीन असली पाहिजे. कारण अल्पकालीन गुंतवणूक करणारा हा ट्रेडर असतो. त्यामुळे दीर्घकाली विचार केल्यास गेल्या १५-१६ वर्षांतील सोन्यावर प्रति वर्षी १५-१६ टक्के परतावा मिळाला आहे. सध्याच्या भावपातळीपासूनही डिसेंबर २०२२ पर्यंत गुंतवणूक उद्दिष्टाचा विचार करून सोन्यात गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा सोन्यात नक्कीच चांगला परतावा मिळू शकतो. सध्या बँकेतील ठेवीवर पाच ते सहा टक्के परतावा मिळत आहे. सध्याचे विविध बाजारांचे (शेअर मार्केट, बाँड मार्केट, ट्रेड, बिझनेस मार्केट) विश्लेषण केल्यास ती वाढत आहेत वा टिकून आहेत. सोने घसरत आहे. पण, अन्य बाजारात मंदीची शक्यता निर्माण झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा सोन्याला होणार आहे. परिणामी सोन्यात तेजी येऊ शकते. बाजारात चढ-उतार येत असतात आणि सोनेही ट्रेड होते. त्यामुळे त्यात चढ-उतार दिसणारच. पण, दीर्घकालीन पाहिल्यास सोने हे वाढतच राहणार आहे. कारण आपल्या आजी-आजोबांनी प्रति १० ग्रॅम ४० रुपये भावाने घेतलेले सोने आज ४०००० रुपयांपेक्षा जास्त पुढे आहे आणि आपण ते खरेदी करीत आहोत.
(लेखक पीएनजी सन्सचे संचालक-सीईओ आहेत.)
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रति १० ग्रॅम ५६ हजार रुपयांवर पोचलेले सोने ४४ हजार रुपयांजवळ आले आहे. सोन्यात झालेली घसरण ही खरेदीची संधी आहे का, याचा घेतलेला आढावा.
WhatsApp us