रशियन-युक्रेन युद्धामुळे २०२२ मध्ये जूननंतर अन्नधान्याचा पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने महागाईने युरोप व अमेरिकेत चार दशकांतील उच्चांक गाठला होता. त्यामुळेच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक, युरोपीयन सेंट्रल बँक व बँक ऑफ इंग्लंडने गेल्या सातत्याने प्रमुख व्याजदरात वाढ केली. तसेच, आगामी काळातही वाढीचे संकेत दिले आहेत. जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांप्रमाणेच भारताच्या रिझर्व्ह बँकेनेदेखील वाढीऐवजी महागाई नियंत्रणात आणण्यास प्राधान्य दिले आहे. चलनाची असणारी जोखीम लक्षात घेऊन जगातील काही मध्यवर्ती बँकांनी २०२२ मध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. यात रशिया व चीन आघाडीवर असून, सोन्याची झालेली खरेदी ही १९६७ नंतरची सर्वांत मोठी व वेगवान आहे. याची पुष्टी वर्ल्ड गोल्ड कौन्सिल व विविध संस्थांनी केली आहे.
सोन्याची एवढ्या मोठ्या स्वरूपात खरेदी होण्यामागे नक्कीच प्रमुख कारणे आहेत. यात अमेरिका व त्यांच्या सहकारी देशांनी रशियाची डॉलरमधील गंगाजळी गोठविली आहे. तसेच, युद्धामुळे व कोव्हिड १९ अन् भूराजकीय अस्थिरतेमुळे मध्यवर्ती बँकांनी जोखीम कमी करण्यासाठी सोन्यालाच पसंती दिली आहे. अशा संस्थांकडून ६७३ टन सोन्याची खरेदी झाली असून, तिसऱ्या तिमाहीतील बँकांची खरेदी सुमारे ४०० टन आहे. वर्ष २००० नंतर सोन्याची एका तिमाहीत झालेली ही मोठी खरेदी आहे. मात्र, रशिय व चीन यांच्यासह अन्य देशांकडून यापेक्षाही अधिकची सोन्याची खरेदी झाली असल्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड कौन्सिल व अन्य वित्तीय संस्थांना वाटत आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये १.८ अब्ज डॉलर मूल्याचे तब्बल ३२ टन सोने खरेदी केले आहे. २०१९ नंतर चीनने सोन्याच्या साठ्यात केलेली पहिली अधिकृत वाढ आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते यापेक्षा अधिक सोने चीनने खरेदी केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याचा अधिकृत साठा जाहीर करणे बंद केले आहे.
डॉलर चलन स्वरूपात गुंतवणूक कमी करण्यासाठी चीन आणि रशियाने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी २०२२ मध्ये केली आहे.
मध्यवर्ती बँकांनी केलेली दरवाढ आणि आगामी दरवाढ ही बाजार व गुंतकदारांना अपेक्षित अशीच आहे. जागतिक पातळीवर भूराजकीय अस्थिरता, चलनवाढ या गोष्टी लवकर आटोक्यात वा पूर्ववत होण्याची शक्यता नजीकच्या काळात वाटत नाही. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता सोन्याच्या भावात २०२३ मध्ये तेजीचे संकेतच सर्वाधिक आहेत. कोव्हिड १९ महामारीनंतर २०२० मधील भारतातील सोन्याचा ५६ हजार रुपायांचा उच्चांक मोडला जाण्याची अपेक्षा आहे. जागतिक पातळीवर सोने १९२० ते २००० डॉलर पातळीवर जाऊ शकते. भारतात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६० ते ६२ हजार रुपयांवर जाऊ शकतो. एकूण वर्षातील सरासरी ही ५६-५८ दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
वर्ष २०२२ च्या सुरुवातीस सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४९,९९० रुपयांवर होता. भूरजाकीय अस्थिरता, रुपयातील घसरण आदींमुळे सोन्याचा दर वर्षभरात १२ टक्के वाढला आहे. म्हणजेच चलनवाढीतही सोन्याने मूल्य नुसते टिकवून धरलेल नाही तर वाढवले आहे. सोन्यात चलनवाढीर मात करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सोन्यात २०२३ मध्ये दुहेरी परतावा मिळू शकतो. त्यामुळे दीर्घ काळासाठी सोने आपल्या गुंतवणूक बास्केटमध्ये असेल पाहिजे, यात शंका नसावी.
लेखक कमॉडिटी तज्ज्ञ व पीएनजी सन्सचे संचालक सीईओ आहेत.